पुणे : नातवाला सोडविण्यासाठी गेलेल्या आजीला कुऱ्हाडीने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गाडीचा कव्हर फाडल्याच्या कारणावरून दोघेजण नातवाला मारहाण करत असल्याचे पाहून त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केल्याची घटना कसबा पेठेत शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल विजय काळे (वय २८, रा. कसबा पेठ) व त्याच्या दोन मित्रांवर पार्वती तानाजी हुलवळे (वय. ७८, रा. कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कसबा पेठेत राहण्यास आहेत. तर आरोपी विशाल काळे हादेखील तेथेच राहातो. पार्वती हुलवळे यांचा नातू ओंकार याने विशाल काळे याच्या गाडीचा कव्हर फाडला होता. त्याच्या रागातून विशाल काळे त्याला मारहाण करत होता. त्यामुळे पार्वती हुलवळे या नातवाला सोडविण्यासाठी गेल्या. त्यावेळी विशाल काळे आणि त्याच्या २ मित्रांनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोळ्याजवळ, व कानाजवळ कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.