वाहतूक कोंडीत पुणे देशात सातव्या क्रमांकावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे सातवे शहर ठरले आहे. तसेच वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीतही पुण्याचा विसावा क्रमांक आहे. राज्याची राजधानी मुंबई सर्वाधिक वाहतूक कोंडीचे देशातील दुसरे शहर ठरले असून आहे. तर संथ वाहतुकीत मुंबईचा चौथा क्रमांक आहे. देशात सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहराचा मान बेंगळुरू शहराकडे कायम आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेमधील संशोधकांच्या पथकाने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.

बेंगळुरू , मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, जयपूर, कोइम्बतूर, अहमदाबाद या क्रमांकानुसार देशातील ही दहा शहरे वाहतूक कोंडीत अव्वल आहेत. ही पाहणी करताना संशोधकांनी गुगल मॅपच्या रिअल टाइम टड्ढॅव्हल डेटाच्या आधारे गुगल सॉफ्टवेअरशी जोडलेल्या लक्षावधी मोबाइलचे डेटा लोकेशन आणि त्याचा वेग याचे विश्लेषण केले. त्या आधारे मोबिलिटी अँड कन्जस्चन इन अर्बन इंडिया हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात सर्वाधिक वेगवान, सर्वाधिक संथ आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची क्रमवार यादी जाहीर केली आहे. या शिवाय विविध सरकारी पाहणीची आकडेवारी, लोकसंख्या, वेतन, वाहनाची उपलब्धता, येण्या-जाण्याचे सरासरी अंतर, शहरांचा आकार व रस्त्यांचे जाळे हे निकषही विचारात घेतल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेमधील संशोधकांच्या पथकासह अमेरिकेतील तीन विद्यापीठांकडून भारतातील १५४ शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि कोंडीची पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार बेंगळुरू देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर ठरले आहे. त्या पाठोपाठ मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या शहरांचा क्रमांक आहे. तसेच सर्वाधिक संथ वाहतूक असणाऱ्या शहरांच्या यादीत कोलकाता प्रथम क्रमांकावर असून, त्यानंतर बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, वाराणसी या शहरांमधील वाहतूक संथ असल्याचे समोर आले आहे.

वाहतुकीचा सरासरी वेग सर्वाधिक असलेल्या शहरांच्या यादीत तमिळनाडूमधील राणीपेट शहराचा प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर श्रीनगर, केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुलम, जम्मू आणि केरळमधील त्रिसूर शहराचा समावेश असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या देशातील प्रथम वीस शहरांमध्ये नागपूर सतराव्या स्थानी असून अकोल्यातील वाहतुकीची गती पुण्यापेक्षाही संथ आहे. वाहतुकीच्या संथगतीसाठी मोटारींच्या वाढत्या संख्येपेक्षाही खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा अभाव कारणीभूत असल्याचे या पाहणीत आढळले आहे. शहरांच्या आर्थिक विकासासोबत चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची गरज या अहवालात नमूद करण्यात आली आहे.