7th Pay Commission : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पगारात होणार ‘बंपर’ वाढ, महागाई भत्ता 11 टक्क्यांनी जास्त मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. मात्र, आता कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आता 11 टक्क्यांची वाढ होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 52 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 65 लाखांपेक्षा अधिक निवृत्तीधारकांना होणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली नाही. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना 1 जानेवारी, 2020, 1 जुलै, 2020 आणि 1 जानेवारी, 2021 ला रिवाईज दरांवर महागाई भत्ता पुन्हा सुरु केला आहे. मात्र, आता केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. यापूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मात्र, आता यामध्ये वाढ होऊन हा भत्ता 28 टक्के होऊ शकतो. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

फॅमिली पेन्शनमध्येही वाढ

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी पेन्शनधारकांच्या कुटुंबासाठी फॅमिली पेन्शनची सर्वाधिक सीमा वाढवण्याची घोषणा केली होती. फॅमिली पेन्शनची मर्यादा जवळपास अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. आत्तापर्यंत फॅमिली पेन्शनची सर्वाधिक मर्यादा 45,000 रुपये प्रति महिना होती. आता यामध्ये वाढ होऊन ही मर्यादा 1.25 लाख प्रति महिना झाली आहे.

अशी असेल वाढ

जानेवारीपासून ते जून 2021 च्या किमान 4 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये जानेवारी ते जून 2020 पर्यंत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होऊ शकते. तर जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत 4 टक्के वाढ आणि जानेवारी ते जून 2021 पर्यंत 4 टक्के वाढ होऊ शकते.