पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळणार 7 वा वेतन आयोग

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. त्याबाबतचे पत्र राज्य शासनाने नगर विकास विभागाकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आले असल्याची माहिती आमदार आण्णा बनसोडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सातव्या वेतन आयोगाचा लाभ पालिकेतील 8 हजार 300 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे आमदार आण्णा बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आझम पानसरे, मंगला कदम, योगेश बहल, वैशाली काळभोर, भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. या घोषणेनंतर पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने याचे स्वागत करत जल्लोष साजरा केला. आमदार आण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. सातवा वेतन लागू झाल्याने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सात ते आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे. यासाठी महापालिकेला 93 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच केवळ दोन महिन्यात हा सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे आण्णा बनसोडे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी 11 जून 2019 रोजी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावेळच्या सरकारने यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. महाविकास आघाडीचे सरकार येताच राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आठ दिवसात हा निर्णय झाला असल्याचे आमदार आण्णा बनसोडे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/