7 वा वेतन आयोग : खुशखबर ! ‘या’ महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याचे संकेत, पेन्शनधारकांनाही लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने महसुलावर परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर रोख लावली आहे. सरकारने जानेवारी 2020 पासून महागाई भत्ता रोखला आहे. जून 2021 पर्यंत याचा एकही रुपया देण्यात येणार नाही असे जाहिर करण्यात आले होते. मात्र, याची मुदत संपण्यास एक महिन्याचा कालावधी राहिला असताना केंद्राकडून काही संकेत मिळू लागले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने केंद्र सरकारचे कर्मचारी यांचा जानेवारी 2020 मध्ये डीए भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये पुन्हा तीन टक्क्यांनी वाढ केल्यानंतर जानेवारी 2021 मध्ये पुन्हा चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली. याप्रकारे हा डीए 17 टक्क्यावरुन वाढून 28 टक्के झाल्याने याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. मात्र, सरकारने यावर गेल्या वर्षी जानेवारीपासून रोख लावली होती.

पीएफमध्ये वाढ होणार

पीएफचे कॅल्क्युलेशन नेहमी वेतन आणि महागाई भत्त्याला जोडून दिले जाते. महागाई भत्ता वाढला तर त्याचा परिणाम पीएफवाढीवरही होणार आहे. याशिवाय डीएमध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या एचआरए, ट्रॅव्हल अलाऊन्स आणि मेडिकल अलाऊन्सवर देखील थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे डीए 17 वरुन 28 टक्के झाल्याने सॅलरी तर वाढणार आहेच, शिवाय पीएफ देखील वाढणार आहे.

पेन्शनरांनाही होणार फायदा

पीएफचा बॅलन्स वाढल्यानंतर त्यावर मिळणाऱ्या व्याजातही वाढ होणार आहे. सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ हा बेसिक सॅलरी आणि डीएच्या आधारावर ठरतो. अशावेळी पीएफमध्येही वाढ होणार आहे. जर रोखलेला महागाई भत्ता मिळाला तर 58 लाख पेन्शनरांनाही फायदा होणार आहे.

म्हणून महागाई भत्ता दिला

महागाई भत्ता हा पगाराचाच एक भाग असतो. यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या एक निश्चित टक्के रक्कम ठरविली जाते. देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. हा भत्ता वेळोवेळी वाढवला जातो. याचा फायदा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील मिळतो.