पुण्यात पॅरोलवर सुटल्यानंतर हुल्लडबाजी करणार्‍या 8 आरोपींना अटक, पिंपरीच्या गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्‍याचा समावेश, सर्वत्र खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – मुळशी तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची पॅरोलवर येरवडा कारागृहातून सुटका झाल्यावर हुल्लडबाजी करत जाणार्‍या ८ जणांना विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, पाच काडतुसासह ४ आलीशान कार जप्त केल्या आहेत.

अटक केलेल्यांमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय ३६ रा. इंद्रायणीनगर भोसरी), आझाद शेखलाल मुलाणी (वय ३०, रा. तळवडे चिखली), आदेश दिलीप ओकाडे (वय २१ रा. सुयोग नगर, निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय ३८ रा. मोरेवस्ती चिखली), संदीप किसन गरुड (वय ४० रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय ४३) सिराज राजू मुलाणी (वय २२) विनोद नारायण माने (वय २६ तिघेही रा. कोळवण, मुळशी) यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गोंधळात कारागृहातून पॅरोलवर सुटलेले समीर मुलाणी व जमीर मुलाणी हे मात्र पळून गेले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची येरवडा कारागृहातून शुक्रवारी सायंकाळी पॅरोलवर सुटका करण्यात आली. ते सुटणार याची माहिती असल्याने त्याचे भाऊ, नातेवाईक मित्र पिंपरी चिंचवड, मुळशी,भोसरी,चिखली परिसरातून येरवडा कारागृहाच्या परिसरात आले होते. येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यावर आरोपी हे त्याचे २० ते २५ नातेवाईक व समर्थक यांच्यासह दुचाकी व चारचाकी गाड्यांमधून तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता हुल्लडबाजी करीत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोरून निघाले होते.

त्यांचा पाठलाग करत विश्रांतवाडी पोलिसांनी फुलेनगर येथील आरटीओ चौक याठिकाणी त्यातील एक चारचाकी गाडी अडवली. इतर समर्थकांना देखील गाड्यांसह थांबण्यास सांगितले. चारचाकी गाडीतून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे व लोखंडी बार अशी घातक शस्त्र जप्त करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडवण्यासाठी आलेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांसह ८ जणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.

त्यांच्याविरुद्ध बेकायदा गर्दी जमवून दंगल माजविल्याचा तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २०००, महाराष्ट्र कोविड १९, तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केल्याच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.