मेंदूची काळजी घेण्यासाठी ‘या’ वाईट सवयींना करा दूर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कामाची धावपळ आणि दगदगीत आपण अनेक चूका दिवभरात नकळत करत असतो. या चूका आपल्या लक्षात येत नसल्या तरी त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होत असतो. या वाईट सवयी कोणत्या याविषयी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. फक्त जखम झाल्यावर किंवा चुकीच्या औषधींमुळेच मेंदूला नुकसान पोहोचते, असे नाही. कमीत कमी सात तासांची झोप घेतली तरच मेंदूला आराम मिळतो. झोप पूर्ण झाली नाही तर मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. याचा वाईट परिणाम होतो.

जास्तीत जास्त एकटे राहिल्याने मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे भविष्यात अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो एकटे राहणे टाळावे. सतत अनेक तास हेडफोन किंवा इयरफोनने मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम होतो. यामुळे अल्झायमरची समस्या होते.

जंक फूडमध्ये सोडियम अधिक प्रमाणात असल्याने मेंदूच्या न्यूरॉन रिसेप्टर्सला इजा होते. जंक फूड जास्त खाल्ल्याने गोंधळाची स्थिती, डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होऊ शकतो. जास्त वेळ अंधारात राहिल्याने त्याचा मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. सूर्यप्रकाश हा मेंदूसाठी खूप महत्त्वाचा आहे. अंधारामुळे मेंदूची विचारक्षमता कमी होऊ शकते. नियमित कोणतीही शारीरिक हालचाल न केल्याने डायबिटीज, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. याचा मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. तसेच धूम्रपान करताना शरीरामध्ये वाईट केमिकल्स जातात. हे रक्त घट्ट करतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो आणि मेंदूला धोका निर्माण होतो. अतिरिक्त आहाराचा संबंध थेट मेंदूशी असतो. जास्त खाल्ल्याने मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.