भाजप संबंधितांकडून ८ कोटी रुपये जप्त

हैदराबाद : वृत्तसंस्था – मंगळवारी प्रचाराची मुदत संपत असलेल्या तेलंगणात भाजपशी संबंधित ८ कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी सोमवारी जप्त केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही रोकड निवडणुक आयोगाच्या सूचनांचे पालन न करता बँकांमधून काढण्यात आली आहे. भाजपने याचा इन्कार केला असून सत्तारुढ तेलंगणा राष्ट्र समितीचे हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

तेलंगणातील सर्व १७ लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तेथील प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी संपत आहे. प्रचाराची मुदत संपत असताना सोमवारी भाजपने त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८ कोटी रुपयांची रोकड काढली. ही रोकड घेऊन भाजपचे कार्यकर्ते कार्यालयात जात असताना वाटेत पोलिसांच्या तपासणीत ही रोकड सापडली. तेव्हा भाजपने ही रोकड पक्षाची असल्याचे सांगून बँकेतून काढल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी बँकेतून पैसे काढताना निवडणुक आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन केले नसल्याचे सांगत ही रोकड जप्त केली आहे.

याबाबत प्रदेश भाजपचे प्रवक्ता कृष्ण सागर राव यांनी सांगितले की, पोलिसांनी सत्तारुढ पक्षाच्या सांगण्यावरुन ही कारवाई केली असून आम्ही निवडणुक आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केलेले नाही़ आम्ही आमच्या खात्यातून पैसे काढले आहेत.