‘या’ व्यक्तीसाठी समस्या बनली त्याची उंची, 8.2 फुट उंच धर्मेंद्रला मिळत नाही लग्नासाठी मुलगी

प्रतापगढ : वृत्तसंस्था – लोकांना नेहमी आपल्या कमी उंचीमुळे तक्रारी करताना तुम्ही पाहिले असेल, पण काही लोक असेही असतात जे आपल्या जास्त उंचीमुळे त्रस्त असतात. असे एक प्रकरण प्रतापगढमधून समोर आले आहे. जेथे धर्मेंद्र नावाचा एक व्यक्ती आपल्या उंचीमुळे त्रस्त आहे. कारण जास्त उंची असल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. धर्मेंद्रची उंची 8 फुट दोन इंच आहे आणि तो भारतातील सर्वात उंच व्यक्ती आहे आणि त्याचे नाव देशातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.

असे असूनही त्याच्या समस्येचे कारणही त्याची उंची आहे. कारण धर्मेंद्रची उंची इतकी जास्त आहे की, कुणीही पिता आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून देण्यास तयार नाही आणि कुणी मुलगीही त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार होत नाही. धर्मेंद्रच्या उंचीच्या बरोबरीची मुलगी भारतातच नव्हे तर जगातील अन्य देशात सुद्धा मिळणे खुप अवघड आहे. याच कारणामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदल्यानंतर सुद्धा धर्मेंद्र खुश नाही, उलट इतके सर्व होऊनही त्याच्या कुटुंबालाही त्याच्या विवाहाची चिंता सतावत आहे.

कारण मुलगी मिळत नसल्याने त्यांचा मुलगा अजून अविवाहित आहे. धर्मेंद्रचे म्हणणे आहे की, त्याचे वय 45 वर्षांचे झाले आहे परंतु अजून तो स्वतासाठी पत्नी शोधू शकलेला नाही. धर्मेंद्र यूपीच्या प्रतापगढचा राहाणारा आहे.

दोन वर्षांपूर्वी धर्मेंद्रचे हिप रिप्लेसमेंट सुद्धा झाले होते. उंचीच्या कारणामुळे यामध्ये खुप अडचणी देखील आल्या होत्या, पण आता सर्वकाही ठिक आहे. आता त्याची अशी इच्छा आहे की, त्याला एखादी अशी मुलगी मिळावी जिच्याशी लग्न करून तो पुढील जीवन जगू शकेल.