बर्ड फ्लूमुळे राज्यात गेल्या 2 महिन्यांत 8 लाख कोंबड्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  गेल्या २ महिन्यांमध्ये बर्ड फ्लूच्या साथ मोठ्या प्रमाणात वाढली होती. या साथीमुळे राज्यात आठ लाख ८४ हजार ०७६ कोंबड्या, ३० लाख ३२१ अंडी आणि ७४ लाख ३९४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले. हा रोग पक्षांमुळे होतो. पक्ष्यांचा मृत्यू झालेल्या संवेदनशील भागाला सतर्कता क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. ज्या भागात याचा प्रसार जास्त प्रमाणात आहे त्या भागात प्रशासनाकडून आवश्यक त्या दक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना राबिवण्यात येत आहे.

काल संध्याकाळपर्यंत या रोगामुळे बीड जिल्ह्यात १५ आणि नंदुरबार जिल्ह्यात ६ अशा एकूण २१ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बगळे, पोपट, चिमण्या, कावळे अशा पक्ष्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली नाही. भोपाळमधील प्रयोगशाळा आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेला मृत्यू झालेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

आतापर्यंत नुकसान झालेल्या पक्ष्यांच्या मालकांना नुकसान भरपाई म्हणून ३ कोटी ३८ लाख १३ हजार रुपये निधी देण्यात आला आहे. व्यवस्थित शिजवलेले कोंबडीचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे आपल्यासाठी सुरक्षित आहे. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.