खूशखबर ! मुंबईत विविध क्षेत्रांत 8 लाख नोकर्‍या, स्थानिकांना मोठी ‘सुवर्ण’संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. त्यांनतर महाराष्ट्र संसर्गाच्या बाबतीत देशात क्रमांक 1 वर पोहचल्याने येथे भितीचे वातावरण तयार झाले. दरम्यान कामधंदे बंद असल्याने हवालदिल झालेले लाखो परप्रांतीय मजूर, कामगार आणि इरत नोकरी-उद्योग करणार्‍यांनी आपल्या गावची वाट धरली. यामुळे महाराष्ट्रात सध्या उद्योग-धंद्यात मोठ्याप्रमाणात कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, संकटातही संधी याप्रमाणे राज्यातील बेरोजगार तरूणांना आता नोकर्‍या मिळण्याची संधी आहे. मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये तब्बल 8 लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई केवळ स्थानिकांचेच पोट भरत नाही तर देशभरातील लाखो लोकांना तिने रोजगार आणि उद्योग दिला आहे. सर्वात मोठे बंदरही मुंबईजवळ असल्याने येथे सोने-चांदीचा व्यवसाय मोठा आहे. देशातील 65 टक्के सोने-चांदीचा व्यवसाय मुंबईत असून येथील सराफा बाजारात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील सुमारे 10 लाख कामगार आहेत. या 10 लाखांपैकी 80 टक्के कारागीर पगारी असून उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करतात. पगारदार असलेल्या कामगारांपैकी 70 टक्के म्हणजेच सुमारे 5.40 लाख कामगार परप्रांतीय आहेत. कोरोनाचे संकट आल्यानंतर हे कामगार गावी गेलेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागांवर स्थानिक तरुणांना कामाची संधी मिळू शकते. यासाठी स्थानिक तरूणांना पुढे येण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.

सराफा व्यवसाय पुन्हा सज्ज
लॉकडाऊन आणखी शिथिल झाल्यानंतर सराफा व्यावसाय लवकरच सुरू होऊ शकतो. पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास उद्योजक सज्ज आहेत. ही दुकाने सुरू झाल्यानंतर कामगारांची आवश्यकता भासणार आहे, सर्व कामगार गावी गेल्याने स्थानिकांना यामध्ये संधी आहे, असे ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डॉमेस्टिक कौन्सिलचे संचालक मदन कोठारी यांनी म्हटले आहे.

बांधकाम व्यवसायात 80 टक्के परप्रांतीय
बांधकाम व्यवसायात मुंबई सर्वात पुढे आहे. या क्षेत्रात सुद्धा परप्रांतीय कामगार मोठ्याप्रमाणात आहे. मुंबई शहर आणि परिसरात या क्षेत्रात 75 हजार तर ठाणे व नवी मुंबई परिसरातील 35 हजार नोंदणीकृत कामगार आहेत. क्रेडाईशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनुसार, 80 टक्के मजूर हे परप्रांतीय असल्याने बांधकाम सुरू होताच या क्षेत्रात किमान 1 लाख कामगारांची तातडीने गरज भासणार आहे.

कापड उद्योगात संधी
कापड व्यवसायातील सर्व नोकरवर्ग सध्या इतर राज्यातील आपल्या गावी गेला आहे. यामुळे दुकाने सुरू झाल्यानंतरही कामगार उपलब्ध नसतील. ही संधी स्थानिकांना असेल. मोठी दुकाने आधी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात 20 ते 25 हजारांचा तरी रोजगार स्थानिकांना मिळेल, असे मुंबई किरकोळ वस्त्रोद्योग असोसिएशन महासंघाचे सचिव शैलेंद्र तिवारी व हरेन मेहता यांनी म्हटले आहे. कापड व्यवसायासाठी मुंबई देशभरात प्रसिद्ध आहे. येथे कापडाची मोठी मोठी बाजारपेठ असून सुमारे 8 हजार दुकानांसह यामध्ये 80 हजारांहून अधिक रोजगार आहे. यामध्ये 80 टक्के कर्मचारी हे अन्य राज्यातील आहेत. येथेही सध्या स्थानिक लोकांना मोठी संधी आहे.

अशी आहे स्थानिकांना संधी

क्षेत्र            उपलब्ध नोकर्‍या

सराफा         5.40 लाख

बांधकाम      1 ते 1.10 लाख

कापड           70 ते 90 हजार

किरकोळ       1 लाख

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like