गाझियाबादमध्ये अवैध फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 8 ठार 20 पेक्षा अधिक जखमी

गाझियाबाद : वृत्तसंस्था – गाझियाबादच्या मोदीनगर तहसीलजवळ बरखखान गावात आज (रविवार) दुपारी बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात एका मागून एक स्फोट झाले. या घटनेत आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अजय पांडे, वरिष्ठ पोलीस अधीक्षक कालानिधी नैथानी व अन्य पोलीस व प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले तसेच कारखान्याला लागलेली आग विझवण्याचे काम वेगाने सुरु आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1279746371319291904

पोलिसांनी सांगितले की, कारखान्यात रविवारी देखील काम सुरु होते. घटना घडली त्यावेळी 30 जण कारखान्यात काम करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अचानक स्फोट होऊन कारखान्याला आग लागली. कारखान्यात एका मागून एक स्फोट झाले आणि संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका उडत असल्याने मजुरांना कारखान्या बाहेर पडता आले नाही. तर काही मजुरांना बाहेर येता आले.

या स्फोटाची माहिती बरखखान गावातच नाही तर आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. एवढेच नाही या घटनेमुळे गाझियाबादपर्यंतच्या आसपासच्या गावात भीतीचे वातावरण बनले आहे. दरम्यान जिल्हा मुख्यालयातून मदत पथके रवाना झाल्यानंतर जिल्हाधिकारी अजय पांडे हे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिथी नैथानी यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले. दुसरीकडे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नीरजकुमार जादौन हे देखील पथकासह घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या स्फोटाचा आवाज खूप दूरवर ऐकायला आला.

कारखाना बेकायदेशीरपणे सुरु होता.
ग्रामस्थांनी सांगितले की, हा कारखाना सुमारे पाच वर्षापासून रहिवासी क्षेत्रात बेकायदेशीरपणे सुरु आहे. पोलीस आणि प्रशासनाला याची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र, असे असतानाही हा कारखाना बंद करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. त्याच कारखान्यात काम करणाऱ्या एकाने पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. यानंतर मोदीनगरचे सीओ आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी या कारखान्याची पाहणी केली होती. एवढेच नाही तर कारखाना मालकाला देखील ताब्यात घेण्यात आले होते. परंतु रात्री उशीरा त्याला सोडून देण्यात आले.