अहमदनगर : शहरातून ८० किलो प्लॅस्टिक जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आज शहरातील नवीपेठ, सावेडी भागासह बोल्हेगाव परिसरातही मनपाच्या पथकांनी दुकानांमध्ये छापे मारुन ८० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. या कारवाईत ३९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

मनपाने प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन दिवसांपासून मनपाने मोहिमेला वेग दिला असून, मध्य शहरासह आता सावेडी, नागापूर व बोल्हेगावातही कारवाईला सुरूवात केली आहे.

माळीवाडा कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यांच्या पथकाने दिनेश सारीज्, क्रेझी कलेक्शन, साईनाथ बॅग हाऊस, महाराणी साडी, सोनू बॅग हाऊस, न्यू फातमा ड्रेसेस आदी दुकानांमध्ये छापे टाकून ५० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. या दुकानदारांना ३० हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

थुंकणार्‍या तिघांना दंड !
महापालिकेच्या आवारात थुंकणार्‍यांवर २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आज तीन नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपये दंडाची कारवाई केली आहे.

You might also like