Solapur News : मुद्दामच लावला जातोय मराठा-ओबीसी वाद, 10 तारखेपासून पाटण तालुक्यातील 80 गावे उपोषण करणार – नरेंद्र पाटील

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी सरकारविरुद्ध दबाव गट तयार व्हायला पाहिजे. सरकार ऐकत नसेल तर उपोषण करावे लागेल. म्हणूनच सोलपुरात ही बैठक घेतली असून, प्रत्येक गावाने उपोषण करावे, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, १० तारखेपासून पाटण तालुक्यातील ८० गावे उपोषण करणार आहेत. मराठा समाजाकडून दबाव गट तयार झाला तरच समाजाला आरक्षण मिळेल. सत्तेसाठी लोक एकत्र येतात आणि आपली पोळी भाजून घेतात. मराठ्यांचा पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षालाही समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटू नये, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठा समाजाच्या विरोधात सरकारने अजेंडा राबवू नये, अन्यथा मराठा समाज विरोधात उभा राहील. ओबीसी-मराठा वाद पुढे करुन महाविकास आघाडीचे सरकार आरक्षण टाळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा-ओबीसी असा वाद मुद्दामन लावला जात असल्याचेही पाटील यांनी म्हटलं.

अण्णासाहेब पाटील महामंडळास एकही रुपया नाही

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना पाटील यांनी म्हटलं, की आताचे शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हाती राहिलेले नाही. मर्सिडीजमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. सध्याचे आंदोलन खऱ्या शेतकऱ्यांचे नसल्याची टीका त्यांनी या वेळी केली. सरकारने सारथी संस्था बंद केली. पण, दुसरीकडे अण्णासाहेब पाटील महामंडळास एक रुपयाही दिला नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून, मुद्दामनं वेळेवर वकील दिला जात नसल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केलं.