महावितरणचा ‘प्रताप’ ! 80 वर्षांच्या वृद्धाला पाठवले चक्क 80 कोटींचे बिल,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरण विभागाने चुकीच्या रक्कमेचे बिल पाठवणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. विभागाकडून अनेकदा तांत्रिक चुकीमुळे असे बिल ग्राहकांना पाठवले जाते. मुंबई येथील नालासोपाऱ्यामधील एका 80 वर्षांच्या वृध्दाला सोमवारी (दि. 22) महावितरणऩे चक्क 80 कोटींचे बिल पाठवून धक्का दिला आहे. बिलाचा आकडा पाहताच त्यांचे डोळे पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

लॉकडाऊनकाळात महावितरणकडून अवाढव्य वीज बिले देण्यात आली असून या बिलांची आता सक्तीने वसुली सुरू आहे. नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या गणपत नाईक (वय 80) यांना सोमवारी वीज कंपनीने चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे. नाईक यांची 2001 पासून तांदळाला पॉलिश करण्याची मिल आहे. तेंव्हापासून कधी 6 कधी सात हजार तर कधी पन्नास हजार असे वापरानुसार बिल यायचे. ते नाईक नियमित भरत होते. मात्र, कोरोना काळापासून त्यांची मिल बंद होती. त्यांनी त्यातील मशिनरीदेखील विकल्याने मिल रिकामी आहे. तरीदेखील त्यांना 80 कोटींचे बिल महावितरणने पाठविल्याने धक्का बसला आहे.

याबाबत महावितरणला विचारले असता, त्यांनी ही चुक तांत्रिक असल्याची खुलासा केला. तसेच गणपत नाईंकांचे वीज बिल हे 80 कोटी नाही तर 6,400 रुपये असल्याची सारवासारव केली आहे. नाईक हे बिल भरतीलही, परंतू त्यांना जो मानसिक त्रास, ताण सहन करावा लागला, त्यांचे जे नुकसान झाले ते कोण भरून देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.