अखेर महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ चा शिरकाव ! ‘त्या’ कोबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंध आदेश लागू

परभणी/ मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आदी पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा ( bird flu) कहर सुरू आहे. या आजारामुळे चिंता वाढली असताना अखेर महाराष्ट्रात देखील ‘बर्ड फ्लू’ ने शिरकाव केला आहे. तीन दिवसापूर्वी परभणी तालुक्यात मुरुंबा गावात मृत पावलेल्या त्या 800 कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ ( bird flu) मुळेच झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलायला सुरुवात केली असून संबधित गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहात दोन दिवसांत 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवले होते. तपासणीच्या अहवालात या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजनेची कारवाई मंगळवारी (दि. 12) पासून करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या अनुषंगाने एक आदेश काढला आहे. मुरुंबा येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत या गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शनास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. मुरुंबा गाव शिवारातील 5 किमी परिसरात हा आदेश लागू केला आहे. स्थानिक पातळीवर बर्ड फ्लू हा रोग नियंत्रात आणणे शक्य आहे. पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी आवश्यकताही नाही, असे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे.