दिलासादायक ! मुंबईत 81% रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात सर्वाधिक वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. मात्र, कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या मोठी असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत सप्टेंबरपासून वाढलेली कोरोनारुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. रुग्णवाढीचा दरही 1.16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 81 टक्के झाली आहे.

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 87 हजारांच्या पुढे असली तरी 1 लाख 52 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही बर्‍यापैकी घटली आहे. सध्या 26,644 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे 1,300 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. काल 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष व 16 महिला होत्या. 32 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तब्बल 10 हजार 65 इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित इमारतींबाबत पालिकेने नुकतेच नवीन धोरण अवलंबले आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीत 10 रुग्ण असल्यास किंवा दोनपेक्षा जास्त मजल्यांवर रुग्ण असल्यास ती संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणावर रुग्णांची नोंद होत असल्यामुळे प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढली आहे. गेल्या 20 दिवसांत प्रतिबंधित इमारतीची संख्या चार हजारांनी वाढली आहे.