राज्यभरातील धरणांमध्ये 82 % पाणीसाठा !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रादेशिक विभागांतील धरणांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे. लघू, मध्यम आणि मोठया अशा सर्व धरणांत सध्या एकूण 82.36 टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत जलसाठयात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जूनमध्ये पावसाने काही काळ दडी मारल्यानंतर जुलै, ऑगस्ट या महिन्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील 141 मोठया धरणांत 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील सर्वात मोठे असे उजनी धरण 100 टक्के भरले असून कोयना धरणातही 99.72 टक्के पाणीसाठा झाला आहे, तर मराठवाडयातील जायकवाडी धरणातही 99.77 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील 258 मध्यम धरणांमध्ये 75.52 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यात 2868 लघू प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठयाचे प्रमाण तुलनेत कमी असून त्यात 40.13 टक्के पाणीसाठा झाला आहे. मोठे, मध्यम व लघू अशा सर्व धरणांतील पाणीसाठयाचा विचार करता राज्यातील एकूण 3267 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठयाची क्षमता 40 हजार 792 दलघमी असून 20 सप्टेंबरअखेर 33 हजार 597 दलघमी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण 82.36 टक्के असून मागच्या वर्षी याच काळात 71.5 टक्के पाणीसाठा होता. सर्वाधिक 87.95 टक्के पाणीसाठा पुणे विभागातील धरणांमध्ये आहे, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी तरीही 71.79 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक विभागात 84.30 टक्के , कोकणात 83.32 टक्के , नागपुरात 81.88 आणि अमरावतीत 77.46 टक्के पाणीसाठा आहे.