शेतकरी आंदोलन : आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यात 83 पोलिस जखमी – दिल्ली पोलीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. आज सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, या मोर्चाला हिंसकवळ लागले. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 83 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली
पोलिसांनी दिली आहे.

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ले केले. यामध्ये महिला पोलिसांवर देखील हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आयुक्तांनी उपद्रवी आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 83 पोलीस जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांवर एनएनजेपी रुग्णालयात उपचार सुरु असून एका पोलिसाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात नाही

आंदोलनादरम्यान दिल्लीच्या आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या आंदोलकाचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला. हा गोळीबार पोलिसांकडून करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दिन दयाळ उपाध्याय मार्गावर हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, आदोलक शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. या शेतकऱ्याचा मृत्यू ट्रॅक्टर पलटी होऊन झाला आहे. आदोलकांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंटचे बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.