Coronavirus : धारावीत ‘कोरोना’चे 84 नवे रुग्ण

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज धारावीमध्ये 84 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1145 झाली आहे. धारावी मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.

धारावीत आज एकाही नव्या रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र, मृत्यू झालेल्या चार जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धारावीत एकूण 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर धारावीतील 31 हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. धारावीत कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.

मुंबईतील कोरोनाचं संकट अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (दि.14) मुंबईत 998 नवे रुग्ण सापडले असतानाच त्यात आज (शुक्रवार) आणकी 933 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णंची संख्या 17 हजार 512 वर पोहचली आहे. तर आज कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 655 वर पोहचली आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.