Thane News : 85 लाख 48 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत, तिघांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन –   भारतीय चलनातील दोन हजारांच्या बनावट नोटा तयार करून त्याची विक्री करणा-या त्रिकुटांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी (दि. 9) अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. या त्रिकुटाकडून 85 लाख 48 हजारांच्या बनावट नोटाही हस्तगत केल्या आहेत. तसेच नोटा छापण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, पेपर रिम्स, मोबाईल आदी सामुग्रीही जप्त केली आहे.

सचिन आगरे (29 रा. कळंबट, रत्नागिरी), मन्सुर खान (45, रा. शिराळ, रत्नागिरी) आणि चंद्रकांत माने (45, रा. साकीनाका, मुंबई) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपीना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरबावडी सर्कल येथील टीएमटीच्या बस थांब्यासमोरील रस्त्यावर एक व्यक्ती भारतीय चलनातील दोन हजारांच्या बनावट नोटा चलनामध्ये वटविण्यासाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे आणि देविदास जाधव आदींच्या पथकाने आगरे याला सापळा रचून बुधवारी (दि 9 ) कापूरबावडी सर्कल येथून रंगेहाथ अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली. त्यानंतर मन्सुर खान आणि चंद्रकांत मानेया दोघांना अटक केली. त्यांच्याकडून भारतीय चलनातील दोन हजार रुपये दराच्या 85 लाख 48 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. आपसात संगनमताने या नोटा छापल्याची कबूलीही या आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नोटा वटवण्यापूर्वीच धाड

एक लाखांच्या बदल्यात पाच लाखांच्या या बनावट नोटा विक्री करण्यासाठी हे टोळके ग्राहकाच्या शोधात होते. त्यांनी या नोटा वटविण्यापूर्वीच युनिट पाचच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांनी याआधीही 12 लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या. मात्र, त्या हलक्या दर्जाच्या असल्यामुळे त्या विक्रीसाठी बाजारात आणल्या नव्हत्या, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.