पुणे शहर पोलिस दलातील 8500 पोलिसांना Covid-19 प्रतिबंधक लस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. तर सध्या अनेक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यामध्ये आता लोकांच्या सेवेसाठी असणाऱ्या पोलिसांनाही लस दिली आहे. तर पुण्यातील शहर पोलिस दलातील ७ हजार पोलिसांना पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १७६६ पोलिसांचे लसीकरण झाले आहे. पोलिसांना लस दिल्याने त्यांना सुरक्षा मिळाली आहे. अधिकतर पोलीस रस्त्यावर कार्य बजावत असल्याने त्यांना लस देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात अनेक कडक निर्बध लागू केले आहे. त्यामध्ये पोलिसांची भूमिका अधिक महत्वाची आहे. पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा टाळेबंदी परिस्थितीत नागरिकांना नियमाचे पालन करायला लावणे, जीव धोक्यात न घालता घरी सुरक्षित राहण्यास सांगणे, तसेच अडचणीत सापडलेले परप्रांतीय कामगारांना त्याच्या जेवणाची आणि प्रवासाची सोय करण्यासाठी माणुसकी म्हणून पोलिसांनी पुढाकार घेताना दिसून आले. या संकटात जवळपास दीड हजार पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर १२ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. तसेच शहर पोलिस दलातील ६ हजार ९५३ पोलिसांना लसीकरणामध्ये पहिला डोस मिळाला आहे. त्यामध्ये ५९१ अधिकारी, तर ६ हजार ३६२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १७६६ पोलिसांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२४ अधिकारी आणि १६४२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, पोलिसांनाही कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. त्यामुळेच लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात ६ हजार ९५३, तर दुसऱ्या टप्प्यात १७६६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. तसेच पोलिस हवालदार महेश गाढवे यांनी म्हटले की, कर्तव्य बजावताना नागरिकांशी थेट संपर्क येत असल्याने संसर्गाची दाट शक्‍यता असते. कोरोनामुळे स्वतःसह कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्‍यक सर्व खबरदारी व काळजी घेत आहोत. त्याचबरोबर कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला असून दुसरा डोसही लवकरच मिळेल. तरीही आवश्‍यक काळजी घेण्यावर भर देत आहोत.