‘पेटा’च्या कार्यकर्त्याचे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील सदस्यत्व होणार रद्द 

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईन

‘पेटा’ संस्थेच्या विरोधात केलेल्या बैलगाडा मालकांच्या आंदोलनाला यश आले आहे. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्याचे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील सदस्यत्व रद्द होणार आहे. सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

बैलगाडा शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि ढोंगी प्राणीमित्र जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत राज्यव्यापी आंदोलन केले होते. महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांची नियुक्ती रद्द करण्याची आंदोलकांची मागमी होती.

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी राज्य सरकारने सक्षम कायदा केला आहे. शर्यती सुरु होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘पेटा’ संस्था त्यामध्ये खोडा घालत आहे, असा आरोप बैलगाडा मालकांनी केला होता.  पेटा’ संस्थेचे कार्यकर्ते जयसिम्हा यांचे  महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळारावरील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा मालकांनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जाणकर यांची भेट घेतली. आमदार लांडगे यांनी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळारावरील ‘पेटा’च्या जयसिन्हा यांचे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. मंत्री जानकर यांनी त्वरित जयसिन्हा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे मान्य केले. सदस्यत्व रद्द करण्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे.

”राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला. त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. तो कायदा अंमलात येणार होता. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने तयार केलेला कायदा जाणून घेणे गरजेचे होते. कायदा वाचला असता तर त्यांना देखील समाधान वाटले असते. परंतु, मला कळत नाही की त्यांना बैलगाडा शर्यतीमध्ये पडण्याची काय गरज आहे. ‘पेटा’ संस्थेबाबत शेतक-यामध्ये प्रचंड नाराजी आहे. ‘पेटा’ संस्था केवळ कागदी घोडे नाचवित आहे. संस्थेला मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून शेतक-यांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. ‘पेटा’ संस्थेचे  कार्यकर्ते जयसिम्हा यांचे  महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळारावरील सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”असे आमदार महेश लांडगे म्हणाले.