फसवणूकीसाठी छापल्या तब्बल 87 कोटींच्या बनावट नोटा, लष्करी जवान शेख अलीम खान निघाला ‘मास्टरमाईंड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात गुन्हे शाखेने बुधवारी तब्बल 87 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या. यामध्ये भारत आणि अमेरिकेसह इतर अनेक देशांच्या चलनी नोटांचा समावेश होता. त्यातील बहुतेक नोटांवर चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया छापण्यात आले आहे. याप्रकरणी लष्कराच्या जवानासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूकीसाठी या नोटा छापल्या असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. सध्या प्रत्येक अँगलने तपास सुरु आहे. या प्रकरणात लष्कराचा जवान आरोपी असल्याने लष्काराच्या इंटेलिजेसकडून देखील तपास करण्यात येत आहे.

शेख अलीम, सुनील सारडा, अब्दुल गनी, अब्दुलगानी खान, रितेश रत्नाकर आणि तुफैल अहमद अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. शेख अलीम खान हा मुख्य सत्रधार असून तो खडकी येथील बॉम्बे सेपर्स बटालियनमध्ये नायक म्हणून कार्यरत आहे.

पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आम्हाला मिलिटरी इंटेलिजेंसकडून बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त कारवाई करून आम्ही शहरातील विमाननगर भागातील फ्लॅटमधून सहा जणांना अटक केली. या टोळीचा मुख्य सुत्रधार हा लष्कराचा जवान शेख अलीम खान हा आहे.

https://twitter.com/puspendraarmy/status/1271021079822102529

पोलीस उपायुक्तांनी पुढे सांगितले की, जप्त केलेल्या भारतीय चलनाच्या बनावटी नोटांची किंमत 43.40 कोटी रुपये आणि अमेरिकन डॉलरचे मूल्य 4.2 कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या बहुतेक भारतीय नोटांवर चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया असे छापण्यात आले आहे. या रॅकेटची लिंक कुठपर्यंत आहे ? एवढ्या मोठ्या प्रमाणात या नोटांची छापाई कुठे करण्यात आली ? यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे ? याचा शोध घेतला जात आहे. तसेच या कारवाईत एक बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे.