मोठी बातमी : कोल्हापूर, सांगलीतून 894 नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. परभणी, लातूर जिल्ह्यात दगावलेल्या कोंबड्या ह्या बर्ड फ्लूनेच दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूर व सांगलीतून आतापर्यंत 894 नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. दरम्यान कोल्हापूर अद्याप एकही कोंबडी दगावली नसली तरी चिकन आणि अंड्याच्या दरात मात्र घसरण सुरु आहे.

बर्ड फ्लूचा संसर्ग परदेशातील स्थलांतरित पक्ष्यांमार्फत राज्यात सुरू झाला आहे. कोल्हापूर, सांगलीत त्याचा अद्याप मागमूसही नाही. पण पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. रोजच्या रोज आजारी कोंबड्यांचे स्त्राव तपासणीसाठी घेणे, ते पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठवणे, रोज सायंकाळी पशुसंवर्धन आयुक्तांना व्हीसीद्वारे दैनंदिन अहवाल देणे आदी कामांच्या माध्यमातून बर्ड फ्लूवर लक्ष ठेवले जात आहे. तथापि आतापर्यंत बर्ड फ्लूमध्ये मानवाचा मृत्यू झाला आहे, अशी एकही घटना राज्यात अथवा कोल्हापुरातही घडलेली नाही. शिवाय मरतूक म्हणून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचीही नोंद नाही. तरीदेखील याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याने पोल्ट्री व्यवसायावर संक्रांत आली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक आणि कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या या उद्योगात सध्या भीतीचे वातावरण आहे.