प्रेमप्रकरणातून आठवीच्या विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

सुरगाणा (नाशिक): पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे एका आठवीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील रामदास वाघमारे असे या मुलाचे नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीवरुन त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

स्वप्नील वाघमारे हा पळसन येथील शासकीय आश्रम शाळेत शिकत होता. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.पळसन येथील शासकीय आश्रम शाळेत पाचवीत शिकणाऱ्या निलेश देशमुख या मुलाला आज सकाळी अडगळीच्या खोलीत कुणीतरी लटकत असल्याचे दिसले. त्याने तात्काळ ही बाब अधीक्षक वाय.ए. मेंडके यांना सांगितली. त्यांनी या घटनेची माहिती सुरगाणा पोलिसांना दिली.

सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील खरे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेची माहिती स्वप्नीलच्या नातेवाईकांना देण्यात आली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमलेल्या जमावाने आणि नातेवाईकांनी दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करुन जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रांताधिकारी अमन मित्तल यांनी येऊन नागरिकांची समजूत काढून कारवाई करण्याचे आश्वासन जमावाला दिले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास सुरगाणा पोलीस करीत आहेत.