रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा कळस :  उंदराने कुरतडल्याने अवघ्या ९ दिवसाच्या बाळाचा मृत्यू

पाटणा : वृत्तसंस्था  – बिहारमध्ये  नऊ दिवसाच्या नवजात शिशुला उंदराने कुरतडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालय  प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
बाळ आजारी असल्याने त्याला  दरभंगा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते,  रात्री १ च्या सुमारास बाळाची प्रकृती चांगल्याच प्रमाणात ठीक होती. मात्र सकाळी ५ च्या सुमारास  उंदराने कुरतडल्याचे दिसले त्याच वेळी बाळ मृतावस्थेत दिसले. असे बाळाच्या वडील यांनी सांगितले  इतकेच नव्हे तर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे बाळाचा मृत्यू झाला असा आरोपही त्यांनी  केला आहे.

मात्र रुग्णालयाचे डॉ. ओमप्रकाश यांनी  हे आरोप फेटाळून लावले आहेत. बाळाची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले आहेत.

यादरम्यान  यासंदर्भात कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी समिती गठित करुन कारवाई करण्यात येईल,असे दरभंगाचे प्रभारी जिल्हाधिकारी कारी प्रसाद यांनी सांगितले आहे.  विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी असे आदेशही दिली आहेत.