बस-जीपचा भीषण अपघातात ; 9 ठार, 30 जखमी

पिलिभीत : बस आणि जीपच्या भीषण अपघातात 9 जण ठार तर 30 जण जखमी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्यात घडली आहे. पुरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन्ही वाहनांची समोरासमोर झालेली धडक अतिशय भीषण होती.

अपघातग्रस्त बस लखनऊहून पिलिभीतकडे निघाली होती. घटनास्थळ पिलभीत जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे. जीप आणि बसची समोरासमोर धडक झाल्यानंतर बस जवळच्या दरीत कोसळली. मृतांमध्ये बसचालकाचाही समावेश आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.

बस आणि जीप अशा दोन्ही वाहनांतील प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. या भीषण अपघातात 7 जण जागेवरच ठार झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शकील (28) असे मृत चालकाचे नाव असून इतर मृतांमध्ये गयादीन (45), कलावती (40), मोहन बहादूर (45), दीपा विश्वास (50) आणि श्याम (12) यांचा समावेश आहे.