गर्दीचा फायदा घेत स्टेट बँकेतून ९ लाखांची रोडक लंपास

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तीन दिवसांच्या बँकिंग कामकाजाच्या सुट्टीनंतर झालेल्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतून ९ लाखांची रोडक लंपास केली. रोकड चोरून नेताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.

बँकेला तीन दिवस सुट्टी असल्याने आज बँकेत नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. यावेळी भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाची ९ लाखांची रोकड चोरट्यांनी हातोहात लंपास केली. सीएमएस या कंपनीचा कर्मचारी सौभर हेंद्रे हा ९ लाख रुपयांची रोकड घेऊन स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतील कॅश काउंटरसमोर उभा होता. त्यावेळी तीन ते चार तरुणांनी रोकड घेऊन उभ्या असलेल्या सौरभ हेंद्रे याला घेरले आणि त्याचे लक्ष विचलित केले.

त्याचवेळी बँकेत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे लक्ष वळवण्यासाठी एकजण दुसऱ्या बाजूने उभा राहिला आणि त्याने दुसरीकडे लक्ष वेधून घेतले. त्याच दरम्यान चोरट्यांनी टेबलावर ठेवलेली बॅग पळविली. चारही चोरटे बँकेच्या सी.सी.टी.व्ही.त कैद झाले आहेत. या चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.