दाबोळी विमानतळावर ९ लाखांचे तस्करीचे सोने जप्त  

पणजी : वृत्तसंस्था – शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. हे सोने त्याने पेस्ट स्वरुपात घेऊन आल्याचे दिसून आले.

दाबोळी विमानतळावर रविवारी उतरलेल्या एअर अरेबिया विमानातील प्रवाशांची येथे सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत असताना एका प्रवाशाच्या हावभावा वरून त्यांना संशय निर्माण झाला. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला बाजूला घेऊन चौकशी सुरु केली. त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याने अंतरवस्त्राच्या आत एका पाकिटात पेस्ट स्वरुपात सोने लपवून आणल्याचे दिसून आले. हे ९ लाख १९ हजार ४७८ रुपये किंमतीचे ३०४ ग्रॅम सोने असल्याचे सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशात आता पेस्ट स्वरुपात सोन्याची तस्करी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. ६ मार्चलाच दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाकडून पेस्ट स्वरुपात आणलेले १८ लाख रुपयांचे ५९० ग्राम सोने पकडले होते.