बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावामध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एका नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वाराज गुरनुले असे या नऊ महिन्याच्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण असून स्वाराजच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

स्वराज हा घरामध्ये झोपला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले. काही वेळानंतर घरातील लोकांना स्वराज दिसला नसल्याने त्याचा शोध सुरु केला. शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. चिमुकल्या स्वराजला बिबट्याने घरातून पळवून नेऊन ठार केल्याने गावात भितीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी ध्यानस्थ बसलेल्या एका बौद्ध भिक्खूवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये भिक्खूचा मृ्त्यू झाला होता. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील पोवनापार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.