दुर्दैवी ! आई-वडिलांच्या भांडणात 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – आई-वडिलांची भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सवना येथे घडली आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून आई-वडिलांची भांडणं सोडवताना मुलीच्या डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने तिचा मृत्यू झाला. तर वडिलांनी केलेल्या मारहाणीत आई जखमी झाली असून तिच्यावर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद देविदास भालेराव आणि त्याची पत्नी रत्नमाला यांच्यात मंगळवारी रात्री वाद झाले होते. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने बुधवारी पहाटे विनोदने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. त्यामध्ये रत्नमाला यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून मुलगी वैष्णवीला जाग आली. तिने आई-वडिलांची भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

भांडण सोडवत असताना विनोदने रागाच्या भरात वैष्णवीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. घाबरलेल्या विनोदने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सावना येथील खासगी रुग्णालयात नेते. या ठिकाणी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमनवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड यांनी पंचनामा करून विनोदचा जबाब नोंदवला. पोलिसांना दिलेल्या जबाबात विनोदने वैष्णवीच्या डोक्यात लोखंडी मारल्याचे कबूल केले. लोखंडी रॉड मारल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची कबूली विनोदने दिली. पोलिसांनी विनोदला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी विनोदकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये विनोद याचा पत्निच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नी रत्नमाला हिचे अनैतिक संबंध असल्याचे चौकशीत समोर आले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून विनोदने पत्नी आणि मुलगी वैष्णवीला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये वैष्णवीचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.