Pune : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दुसऱ्या मुलीवर बळजबरीचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहर दोन वेगवेगळ्या घटनांनी हादरले आहे. अप्पर इंदिरानगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने 11 वर्षांच्या मुलीला गार्डनमध्ये नेऊन बलात्कार केला. तर दुसऱ्या एका घटनेत भवानी पेठेत एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. गुन्ह्यातील आरोपींचे वय 15 आणि 47 वर्ष असे आहे. या प्रकरणी बिबवेवाडी आणि खडक पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिली घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यातील पीडित मुलगी 11 वर्षांची असून, आरोपी देखील अल्पवयीन (वय 15) आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी अप्पर परिसरात राहतात. मुलगी तिच्या राहत्या घराच्या खिडकीत खेळत होती. त्यावेळी आरोपी तेथे आला. तुझी खेळणी खाली पडल्याचे सांगून आरोपीने तिला खाली बोलावले. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन जवळच्या गार्डनमध्ये गेला. तेथे त्याने मुलीवर अतिप्रसंग केला. हा प्रकार बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. बिबवेवाडी पोलीस तपास करत आहेत.

तर दुसरी घटना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठेत घडली. पीडित मुलगी (वय 14 ) गुरुवारी पहाटे नमाज पठण करून घराजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहात जात होती. त्यावेळी एका 47 वर्षीय आरोपीने तिचा रस्ता अडवला. मुलीचे आणि तिच्या मित्राचे एकत्र असलेले फोटो आरोपीने तिला दाखवले. ते फोटो तिच्या आई-वडिलांना आणि वस्तीतील लोकांना दाखविण्याची धमकी आरोपीने तिला दिली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती खडक पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. खडक पोलीस तपास करत आहेत.