चीनमध्ये ‘कोरोना’मुक्त झालेल्या 90 % रुग्णांच्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम

पोलिसनामा ऑनलाईन – वुहानमधून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली होती. तेथे बाधा झालेल्या अनेकांच्या फुफ्फुसांना विषाणूमुळे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना संसर्गामधून पुर्णपणे बर्‍या झालेल्या व्यक्तिंनाही संसर्ग झाल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. वुहानमधील एका प्रमुख रुग्णालयाने त्यांच्याकडे उपचार घेऊन करोनावर मात करणार्‍या रुग्णांच्या काही चाचण्या केल्या. या चाचण्यांमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे 90 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला खूप नुकसान झाले आहे. तर पाच टक्के रुग्णांना पुन्हा संसर्ग झाला आहे. वुहान विद्यापिठाच्या झोंगनन रुग्णालयातील तज्ज्ञ पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने एप्रिल महिन्यापासून कोरोनावर मात करणार्‍या 100 रुग्णांच्या चाचण्या केल्या त्यानंतर हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. वर्षभर चालवण्यात येणार्‍या या चाचण्यासंदर्भातील मोहिमेतील पहिला टप्पा जुलैमध्ये संपला आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांचे सरासरी वय हे 59 वर्षे इतके होते. पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेल्या चाचणीमध्ये 90 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान झाले आहे. म्हणजेच या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या माध्यमातून होणारे श्वासोच्छवासाशीसंबंधीत कार्य पूर्वीप्रमाणे आणि सामान्य व्यक्तींप्रमाणे होत नाही. पेंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने रुग्णांवर अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या. यामध्ये अगदी भटकंतीचाही समावेश होता. यामध्ये असे दिसून आले की कोरोनावर मात केलेले रुग्ण सहा मिनिटांमध्ये 400 मीटर चालू शकतात. तर ठणठणीत व्यक्ती याच कालावधीत 500 मीटरचे अंतर कापत असल्याचे दिसून आले आहे.