Coronavirus : महाराष्ट्र-गुजरातसह ‘या’ 10 राज्यांनी वाढवली मोदी सरकारची चिंता, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात कोरोना संक्रमणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. देशात कोरोना संक्रमितांची संख्या ही 78 हजारांच्या पुढे गेली आहे. तर गेल्या 24 तासांत तब्बल 3722 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात आता मृत पावलेल्या लोकांची एकूण संख्या ही 2549 वर पोहचली आहे. दरम्यान 26 हजारांहून अधिक लोक उपचारातून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील या राज्यांनी अधिक चिंता वाढविली आहे कारण या 10 राज्यांमध्ये तब्बल 90% रुग्ण आढळले आहेत.

देशातील या 10 राज्यांनी वाढवली चिंता

देशात ज्या 10 राज्यांनी चिंता वाढविली आहे ते म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, बिहार, पंजाब आणि मध्य प्रदेश हे आहेत. यापैकी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1495 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच तमिळनाडूमध्ये 509 रुग्ण, गुजरातमध्ये 364 आणि दिल्लीत 359 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बिहारमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

दरम्यान देशात काही राज्यांमध्ये कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. बिहार, कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या पार गेली आहे. गेल्या 24 तासांत बिहारमध्ये 109 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही संख्या 940 वर पोहोचली आहे. बिहारमध्ये जे रुग्ण आढळले आहेत त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण हे मजूर वर्गातील आहेत, जे देशाच्या इतर राज्यांतून परत आले आहेत. दरम्यान आता हरियाणा आणि ओडिशामध्येही रुग्णांची संख्या वाढली असून एकट्या चंदीगढमध्ये जवळपास 189 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे.

कोरोनमुक्त गोवा राज्यात 35 दिवसांनी सापडले कोरोनाचे नवीन रुग्ण

देशात गोवा राज्य असे होते तेथे कोरोनाचा एकही रुग्ण गेल्या 35 दिवसांमध्ये आढळला नव्हता. मात्र गोव्यात बुधवारी कोरोनाचे 7 नवीन रुग्ण आढळले आहेत. या 7 रुग्णांपैकी 5 रुग्ण हे एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील सोलापूर येथून गोव्याला गेले होते. त्यामुळे कोरोनामुक्त गोवा राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.