कोरोना संकटात ‘मनोरा’ पुन्हा उभारण्यासाठी 900 कोटींचे टेंडर; भाजपाकडून ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइऩ –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. ऑक्सिजन, बेड, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. असे असताना ठाकरे सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 900 कोटींचे टेंडर काढले असून याची वृतपत्रात जाहीरात दिली आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली आहे. भातखळकरांनी म्हटले आहे की, MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेल दिसत आहे. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावे, टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना अशा शब्दात त्यांनी पवार अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील नरीमन पॉइंट परिसरात विधानभवना जवळ असलेले मनोरा आमदार निवास 20 वर्षापूर्वी बांधलेले आहे. 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनोरा आमदार निवासाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. यात या इमारती धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळले होते. पाटील हे मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक 112 मध्ये राहत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मनोरा आमदार निवासाच्या चार इमारती 1996 साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम खराब झाले आहे. सदनिकांमधील छताचे प्लॅस्टर कोसळत असून काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी येत होत्या. त्यानंतर फेब्रुवारी 2018 पासून आमदार निवास पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आले आहे.