’92 लाख पुन्हा मागितल्यास जिवे मारीन’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आमदार शिवाजी कर्डिले यांनी शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व माझ्यावर  पिस्तूल रोखून जमिनीचे साठेखत करताना दिलेले 92 लाख रुपये परत मागितल्यास जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली व साठेखताची प्रत हिसकावून घेतली, अशी साक्ष गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिलिंद मोभारकर यांनी आज नगर येथील न्यायालयात दिली.

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर हद्दीतील  23 एकर जमिनीच्या व्यवहारात शहरातील नामांकित नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांची 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. शिवाजी कर्डिले, प्रकाश कर्डिले यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुरू आहे. खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांची सर तपासणी पूर्ण झाली.

साक्ष देताना ते म्हणाले की, ‘कांकरिया यांना बुऱ्हाणनगर गावच्या हद्दीतील सर्व्हे नंबर 282 व 283 मधील 23 एकर जमीन प्रत्‍येकी सव्वासहा लाख रुपये याप्रमाणे देण्याची बोलणी आमदार शिवाजी कर्डिले व प्रकाश कर्डिले यांच्यासोबत झालेली होती. सदर जमिनीच्या व्यवहाराबद्दल साठेखत करण्यात आले होते. सन 2000 ते 2006 या दरम्यान  92 लाख रुपये नेत्रतज्ञ डॉ. कांकरिया यांनी कर्डिले यांना दिले होते. मात्र, सदर जमीन डॉ. रावसाहेब अनभुले यांना विक्री करण्यात आली होती. सदर जमिनीचे 92 लाख रुपये परत घेण्यासाठी आमदार कर्डिले यांनी डॉ. कांकरिया यांना सन 2011 मध्ये त्यांच्या बंगल्यावर बोलाविले होते. त्यावेळी डॉ. कांकरिया यांच्यासोबत  सामाजिक कार्यकर्ते  मिलिंद मोभारकर हेही गेले होते. तेथे आमदार कर्डिले यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत कांकरिया आमच्याकडील मूळ साठेखत हिसकावून घेतले.

आजच्या सुनावणीत सामाजिक कार्यकर्ते व खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिलिंद मोभारकर सरतपासणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी मोभारकर यांची उलटतपासणी होईल, असे सांगण्यात आले.