हृदयविकाराचे 4 झटके येऊन सुद्धा नाशकातील 92 वर्षीय वयोवृद्धाची कोरोनावर मात

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाची कोरोनाची लाट अतिशय माणसाला बिकट करून टाकणारी दिसत आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतो आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. तर अधिक भीती तर लहान मुलं आणि वृद्धांमध्ये आहे. अशा परिस्थतीत मनमाड येथील एका ९२ वर्षीय वृद्धाने कोरोनावर धाडसाने मात केलीय. विशेष म्हणजे त्या वृद्धाला हृदयविकाराचे ४ झटके देखील आले होते. अनेक आजारांनी कवळा घातला असताना सुद्धा त्या वृद्धाने आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला स्वतःपासून पळवून लावलं आहे. नामदेव किसन शिंदे (वय,९२) असे त्या वृद्धाचे नाव आहे.

नामदेव शिंदे हे रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते मागील २६ दिवसापासून कोरोनाशी लढा देत होते. त्या काळात त्यांची अनेक वेळा प्रकृती देखील बिघडली. कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांची शारीरिक गुंतागुंतही वाढली होती. ४ वेळा हृदयविकाराचा झटका देखील आला. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची गुंतागुंतीची आणि जटील शस्त्रक्रियाही केली गेली.

या दरम्यान, त्यांना उच्च रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रास देखील आहे. अशा सर्व आजाराला धुडकावून अखेर त्यांनी २६ दिवसानानंतर कोरोनाशी झुंज संपवून कोरोनाला हरवलं आहे. यानंतर ते सुखरूप घरी आले आहेत. त्यांच्या घरी आगमनाने परिवारातील सदस्य आनंदीत आहेत. तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी त्यांनी सांगितलं की, कोरोनाला घाबरून न जाता सकारात्मक विचार ठेवलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्यवेळी औषधं घेतली तर कोरोनावर नक्की मात करता येते. एवढ्या शारीरिक व्याधी असताना त्यांनी कोरोनावर मात केल्यानं ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही मराठी म्हण पुन्हा एकदा सार्थ ठरली आहे.