82 वर्षाच्या आजोबांनी ‘कोरोना’वर केली मात, दिला ‘हा’ सल्ला

जळगाव : कोरोनामुळे ज्येष्ठ लोकांचा अधिक प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ लोकांची अधिक काळजी घेण्यास सांगितले जात आहे. यातच आता अशा काही ज्येष्ठ लोकांनी कोरोनाला हरवून ठणठणीत बरे झाले आहे. यात, जळगाव, सांगली आणि मुंबई येथील उदाहरणे समोर येत आहेत.

जळगाव जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील ६१ टक्क्यांच्या वर गेले असले तरी आता जळगाव जिल्ह्यावासियांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णीमधील ९२ वर्षीय आजोबा अवघ्या आठ दिवसांत कोरोनाला हरवून ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना आज डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालय येथून टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला.

यावल तालुक्यातील डांभूर्णीमधील ९२ वर्षीय अमृत पवार या वृद्ध नागरिकास करोना विषाणूची लागण झाली होती. या आजोबांना श्वास घ्यायला त्रास झाला. तसेच त्यांना कफ देखील झाला होता. यातच त्यांना अशक्तपणाही जाणवत होता. त्यामुळे त्यांना ८ जुलै रोजी डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

कोविड रुग्णालयात डॉ. वैभव पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. पाराजी बाचेवार यांच्या टीमने ९२ वर्षीय कोरोनाबाधित आजोबांवर उपचार केले. त्यांचा आत्मविश्वास वाढवून जगण्याची जिद्द सांगितली. तसेच योग्य उपचार केले. त्यामुळे ९२ वर्षीय आजोबा अवघ्या आठ दिवसांत कोरोनाला हरवून ठणठणीत बरे झाले. बुधवारी (दि.१५) करोनोमुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.

करोना विषाणूला घाबरू नका, त्याचा आत्मविश्वासाने सामना करा. नक्कीच सगळेजण यावर मात करतील, असा संदेशही आजोबांनी यावेळी अनेकांना दिला. ९२ वर्षीय आजोबा करोनामुक्त झाल्याने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या जिद्दीला सॅल्यूट केले.

सांगलीमधील शिराळ्यातील १०० वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
सांगली जिल्ह्यातील शिराळामधील १०० वर्षीय आजोबांनी काही दिवसांपूर्वीच करोना विषाणूवर मात केली. त्यांना २७ जून रोजी उपचारासाठी सांगलीमधील करोना उपचार रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचार घेऊन अवघ्या १३ दिवसांत त्यांनी करोना संसर्गावर यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला.

मुंबईत रुग्णालयात त्या आजोबांचा १०१ वा वाढदिवस साजरा
करोना हा आजार जीवघेणा असला तरी त्यावर सहज मात करता येऊ शकते, हे मुंबईमधील एका १०० वर्षांच्या आजोबांनी करून दाखवले आहे. अर्जुन गोविंद नारिंग्रेकर असे या आजोबांचे नाव आहे. वयाच्या शंभरी गाठली असताना आणि न्युमोनिया झालेला असतानाही त्यांनी कोरोनावर मात केली आहे.करोना झाल्यानंतरही न डगमगता त्यांनी उपचार करून घेतले. विशेष म्हणजे डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालयातमध्येच या आजोबांचा त्यांचा १०१वा वाढदिवसही साजरा केला.