Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चे 933 नवीन रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू, बधितांचा आकडा 17000 पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील कोरोनाचं संकट अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (दि.14) मुंबईत 998 नवे रुग्ण सापडले असतानाच त्यात आज (शुक्रवार) आणखी 933 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 17 हजार 512 वर पोहचली आहे. तर आज कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 655 वर पोहचली आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 650 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती केले आहे. तर कोरोनाच्या संशयावरून भरती करण्यात आलेल्या 231 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज मुंबईत एकूण 933 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मुंबईत कोरना रुग्णांची संख्या 17512 झाली आहे. तर आज 334 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मुंबईत 34 जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील मृतांचा आकडा 655 वर गेला आहे. पालिकेने आज 34 रुग्ण दगावल्याचे सांगितलं असलं तरी त्यातील 10 रुग्णांचा मृत्यू 10 ते 12 मेच्या दरम्यान झाला होता. त्यावेळी त्यांचा स्वॅब चाचणी अहवाल आला नव्हता. आज हा अहवाल आला असून त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. या रुग्णांपैकी 16 रुग्णांना इतरही आजार होते. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 21 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे.