धक्कादायक ! मराठवाड्यात वर्षभरात ९४७ पोशिंद्यांनी संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जमाफीचा लाभ, बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शासनाकडून घोषणा झाली असली तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यातच आवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. घेतलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. मराठवाड्यात १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत तब्बल ९४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला. त्यात शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नैराश्याच्या खाईत ढकलला गेला. त्यातच शासनाकडूनही भरीव मदत मिळाली नाही. मागीलवर्षी २०१७ मध्ये मराठवाडा विभागात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे. सरकारने केलेल्या कर्जमाफी योजना फसवी निघाली. त्याचा लाभ मिळण्यास झालेला विलंब त्याचबरोबर बोंडआळीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदत देण्याकडे शासनाने केलेली दिरंगाई आणि कमी पावसामुळे घेतलेल्या पिके हातातून गेले आणि शेतमालाला भाव मिळत नसल्याच्याच्या कारणाने आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात (१९७ ) झाल्या असून त्यापाठोपाठ औरंगाबाद (१४९), परभणी (१२९) व उस्मानाबाद (१४०) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा शंभरच्या वर आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात ६४ आत्महत्या झाल्या आहेत.
२०१८ मध्ये मराठवाड्यात तब्बल ९४७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. यातील ६०३ शेतकरी कुटुंबांना सरकारी मदत मिळाली. त्यातील ८० प्रकरणे अपात्र ठरवली, तर आतापर्यंत २६४ प्रकरणांची चौकशी अद्यापही शासन दरबारी सुरू असल्यामुळे प्रलंबित आहेत. काही प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांचे वारस मदतीपासून वंचित राहिले आहेत.