मागच्या वर्षी देशात झाले 965 भूकंप, प्रत्येक दिवशी तीनवेळा थरथरला भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत भारतात एकुण 965 वेळ भूकंप झाला अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. भूकंपाचे हे आकडे नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजी (एनसीएस) कडून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला देण्यात आले. या 965 भूकंपाच्या झटक्यांपैकी 13 झटके दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले. हे सर्व 965 झटके 3 तीव्रता किंवा त्यापेक्षा जास्त होते.

वॉल्कॅनो डिस्कवरी डॉट कॉमनुसार, मागच्या वर्षी 6.0 तीव्रतेचे दोनच झटके जाणवले. तर 25 वेळा 5.0 से 6.0 तीव्रतेच्या दरम्यानचे भूकंप झाले. 4 ते 5 तीव्रतेदरम्यान 355 भूकंप झाले. 3 ते 4 तीव्रतेचे 388 भूकंप आणि 2 ते 3 तीव्रतेचे 108 भूकंप देशात जाणवले. भारतात जो सर्वात जास्त भूकंप जाणवला तो 22 जुलैला चीनच्या शिजांग परिसरात झाला होता. त्याची तीव्रता 6.4 होती.

जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञ आणि एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सध्या पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट सरकत आहेत, ज्यामुळे इतके भूकंप येत आहेत. देशातील मोठ्या भागात हे धक्के जाणवले.

अनेकदा दोन टेक्टोनिक प्लेटच्या मध्ये तयार झालेला गॅस किंवा प्रेशर रिलिज होतो तेव्हा आपल्याला भूकंपाचे झटके जाणवतात. ही स्थिती उन्हाळ्यात जास्त दिसते. नुकताच एक रिपोर्ट आला होता की, भारतीय टेक्टोनिक प्लेट हिमालयाच्या टेक्टोनिक प्लेटकडे सरकत आहेत. या कारणामुळे आपल्याला उन्हाळ्यात जास्त झटके जाणवतात.

डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देश चार भूकंप झोनमध्ये विभागण्यात आला आहे. झोन-5 म्हणजे सर्वात जास्त भूकंपाची ठिकाणे आहेत. यामध्ये काश्मीर खोर्‍याचा भाग, हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातचे कच्छ, उत्तर बिहार, सर्व उत्तर-पूर्वेतील राज्य आणि अंदमान-निकोबार येते.

झोन-4 मध्ये लडाख, जम्मू-काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाबचे काही भाग, दिल्ली, सिक्किम, यूपीचा उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगालचा काही भाग, गुजरात आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि राजस्थानचा सीमावर्ती भाग.

झोन-3 मध्ये केरळ, लक्षद्वीप, उत्तर प्रदेशचा खालचा परिसर, गुजरात-पंजाबचे काही भाग, पश्चिम बंगालचा भाग, मध्यप्रदेश, उत्तर झारखंड, छत्तीसगढ़, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगना, तमिळनाडु आणि कर्नाटक.

झोन-2 म्हणजे सर्वात कमी भूकंपीय हालचालींचे क्षेत्र होय. यामध्ये अनेक राज्यांचे काही छोट-छोटे भाग येतात. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, नॅशनल सीस्मोलॉजिकल नेटवर्क 2021-22 मध्ये 35 फिल्ड स्टेशन लावणार आहे. यासोबतच देशात एकुण 150 भूकंप स्टेशन होतील. जे पृथ्वीच्या हालचालीची माहिती देतील.

या भूकंपांच्या अभ्यासासाठी नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी इस्त्रोच्या मदतीने सॅटेलाइट इमेजिंगची मदत घेत आहे. याशिवाय इंन्स्टीट्यूट ऑफ हिमालयीन जियोलॉजी डेहरादून आणि आयआयटी कानपुर सुद्धा या कामात मदत करत आहेत. या तीन संस्था सध्या दिल्ली आणि जवळपासच्या परिसराचा अभ्यास करत आहेत.