काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ ते ६ दिग्गजांसह त्यांची मुलं भाजपात येण्यासाठी आमच्या संपर्कात : गिरीश महाजन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश चर्चेचा विषय ठरत आहे. रणजितसिंग मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. ते आज अधिकृतरित्या बिनशर्त भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जळगावातील संर्पक कार्यालयात महाजन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच ते सहा मोठे नेते आणि त्यांची मुलं देखील भाजपात येण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत. ते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. तसंच लोकांचा भाजपावर विश्वास वाढला आहे. सुशिक्षित पिढीचा देखील वाढता कल दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राजकारणाला तरूण पिढी पूर्णपणे कंटाळली आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

जळगाव मतदारसंघासाठी उमेदवार हा निवड समितीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपाची उमेदवारांची नावे जाहीर होतील, असं महाजन यांनी सांगितल. त्यानंतर भाजपवर मुले पळविण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी फेटाळून लावला. आमच्याकडे जवळपास १४ ते १५ दिग्गज नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असं त्यांनी सांगितलं.

महापालिका, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पूर्णपणे सुपडासाफ झाला आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. एवढ्या मोठ्या संख्येने भाजप मागच्या निवडणुकीत निवडून आली. जळगावात काँग्रेसला लोकसभा किंवा विधानसभात नुसता भोपळाही फोडता आला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार जळगाव जिल्ह्यात आहे. इतर पक्षांकडे काहीही शिल्लक नाही. एखादा खासदार तर सोडाच, किमान आता आमदार विरोधकांनी निवडून दाखवावा, असं आव्हानही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.