राज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 99 टक्के म्हणजेच 2 कोटी 50 लाख सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व जिल्ह्यातील ग्रामीण अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण सन 2002-03 पासून सुरू झाले होते.

महसूल विभागाने ग्रामीण भागातील भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेल्या ई-फे रफार प्रकल्पाद्वारे संगणकीकरण पूर्ण करून सन 2015-16 पासून सर्व संगणकीकृत अधिकार अभिलेख ऑनलाइन करण्यात आले. राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 358 तालुक्यातील दोन कोटी 53 लाख गाव नमुना सातबारा ऑनलाइन करून त्यातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सन 2018-19 पासून राज्यातील सर्व ऑनलाइन अधिकार अभिलेख डिजिटल स्वाक्षरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्य:स्थितीत 2 कोटी 53 लाख सातबारांपैकी 99 टक्के म्हणजेच दोन कोटी 50 लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरित झाले आहेत. संकेत स्थळावरून प्रति सातबारा 15 रुपये एवढे नक्कल शुल्क डिजिटल भरणा करुन 21 लाख 77 हजार डिजिटल स्वाक्षरित सातबारा डाउनलोड झाले आहेत,अशी माहिती ई-फे रफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.