13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. जळगावातील तुकारामवाडीमध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलाने आपल्या नातेवाईकांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर मृत्यूपूर्वी मुलगा आपल्या मोबाइलवरुन काही वेबसाइट्स पाहत होता, त्यात तो मृत्यूची वेळ शोधत होता. ही बाब ऐकून अनेक पालकांना धक्काच बसला आहे.

मिळालेली माहिती अशी की, चार महिन्यांपूर्वी हा मुलगा आपल्या नातेवाईकांच्या घरी राहायला आला होता. तर मुलगा ऑनलाइन क्लासचं कारण सांगून नेहमी आपल्या मोबाइलमध्ये असायचा. तो कोणासोबत खेळतही नसे. मुलाचे वडील सिंदखेळा येथे राहतात, तर त्यांचा नातेवाईक जळगावमध्ये लॉन्ड्री स्टॉल चालवतात. १३ वर्षांच्या त्या मुलाने आपल्या नातेवाईकाच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबात गोंधळ उडाला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी मुलगा आपल्या नातेवाईकाच्या घरात एकटा होता. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीय त्याला जळगावातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. पीएसआय सोनावणे यांनी सांगितलं की, पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तपासात आलेल्या माहितीनुसार, आम्हाला शंका आहे की, तो आत्महत्येपूर्वी काही वेबसाइट्सच शोधत होता. त्याच्या भीतीने त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. तसेच मृत्यूच्या काही वेळापूर्वी मुलाने आपल्या मोबाइलवरुन एक बेवसाइट ओपन केली होती. यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूची वेळ दिल्याचा दावा केला होता. मुलाने आपली माहिती या वेबसाइटवर भरली होती, त्यानंतर ही घटना घडली आहे.