पुण्यातील डेक्कन परिसरातील केमिकल फर्ममध्ये 62 वर्षीय शिपायाकडून 33 वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन

पुणे पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिषाला विचारले असून, त्याने आपली फे्रंडशिप होऊ शकते असे म्हणत 62 वर्षीय ऑफिस बॉयने महिलेशी अश्लील वर्तनकरून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. डेक्कन परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अवधुत पानसे (वय 62) याला पोलिसांनी अटक केली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील एका केमिकल फर्ममध्ये फिर्यादी या नोकरीस आहेत. त्याचठिकाणी आरोपी हा ऑफिस बॉय (शिपाई) काम करतो. दरम्यान, त्याने दुपारी अचानक फिर्यादींचा हात धरून त्यांच्याशी अश्लील वर्तन केले.

तसेच, त्यांना हॉटेलात अन फिक्चरला जाऊ, मी ज्योतिषाला विचारले असून, आपली फ्रेंडशिप होऊ शकते असे म्हणून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादींनी डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखलकरून पानसे याला अटक केली आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.