Budaun मध्ये अंगणवाडी कार्यकर्तीवर अत्याचार, गँगरेप करून गुप्तांगात टाकला रॉड, पाय सुद्धा तोडला

बदायूं: वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील ही घटना आहे. येथे एका 50 वर्षीय आंगणवाडी कार्यकर्तीसोबत निर्भयासारखेच राक्षसी कृत्य झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी कार्यकर्तीवर गँगरेप केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, ज्याचा धक्कादायक रिपोर्ट आता समोर आला आहे.
पोस्टमॉर्टमनुसार, महिलेच्या गुप्तांगात रॉडसारखी एखादी वस्तू टाकल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. तिची डावी बरगडी, डावा पाय आणि उजव्या फुफ्फुसाचे वजनदार वस्तूने वार केल्याने नुकसान झाले आहे. या प्रकरणात बेपर्वाई केल्याच्या आरोपात एसएसपी संकल्प शर्मा यांनी पोलीस ठाणे प्रमुख राघवेंद्र प्रताप सिंह यास निलंबित केले आहे.
ही खळबळजनक घटना बदायूं जिल्ह्याच्या उघैती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. या गावात राहणारी एक 50 वर्षीय आंगणवाडी कार्यकर्ती गावाजवळ असलेल्या एका मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी गेली होती. यानंतर ती घरी परतली नाही.
स्थानिक लोकांचा आरोप आहे की, रात्री सुमारे 12 वाजता एका कारमधून आलेल्या दोन व्यक्ती महिलेला रक्ताने माखलेल्या आवस्थेत तिच्या घराच्या दरवाजासमोर फेकून पळून गेल्या. असे म्हटले जात आहे की, यापूर्वी आरोपी आपल्या गाडीतून महिलेला उपचारासाठी चंदौसी येथे सुद्धा घेऊन गेले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, कुटुंबियांनी घटनेची माहिती उघैती पोलीसांना दिली आणि सामुहिक बलात्कारानंतर हत्येचा आरोप केला. कुटुंबियांचे म्हणणे आहे की, उघैती पोलीस ठाण्याचा प्रमुख रावेंद्र प्रताप सिंहने त्यांची फिर्याद ऐकणे तर दूरच घटनास्थळाचा पंचनामा सुद्धा केला नाही.
सोमवारी दुपारी 18 तासानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. महिला डॉक्टरसह तीन डॉक्टरांच्या पॅनलने पोस्टमॉर्टम केले. सायंकाळी रिपोर्ट आला तेव्हा समजले की, महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर घाव होते. भरपूर रक्तसुद्धा गेले होते. रिपोर्टमध्ये एखादा लोखंडाचा रॉड किंवा तत्सम वस्तू गुप्तांगात टाकल्याचे समोर आले.
पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून अधिकारी हैराण झाले आहेत. तर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महंतसह त्याचा एक साथीदार आणि ड्रायव्हरच्या विरोधात गँगरेप नंतर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अजूनही फरार आहेत. आरोपी बाबा सत्यनारायण, त्याचा चेला वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यास पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना एसएसपी संकल्प शर्मा यांनी मीडियाला सांगितले की, उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि कुटुंबाच्या तक्रारीनंतर तीन लोकांच्या विरूद्ध हत्या व अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींच्या अटकेसाठी चार टीम तपास करत आहेत. लवकरच सर्वांना अटक केली जाईल.