Coronavirus : पुण्यात 56 वर्षीय ‘कोरोना’बाधित डॉक्टरचा ससून हॉस्पीटलमध्ये मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – खासगी प्रॅक्टिस करणार्‍या एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डॉक्टरांचा मृत्यु होण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे.
घोरपडी भागातील ५६ वर्षांच्या हे डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत होते. त्यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

एका डॉक्टरांच्या मृत्युनंतर आता खासगी तसेच सरकारी दवाखान्यात उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांचा सर्वात जास्त संपर्काचा धोका असतो. त्यात अनेकदा प्रथम आलेल्या रुग्णाचा इतिहास डॉक्टरांना माहिती नसतो. त्यामुळे शहरातील असंख्य डॉक्टरांनी आपली प्रॅक्टिस सध्या बंद ठेवली आहे.

पुण्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात पुण्यात तब्बल २९१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५ हजार १६७ झाली आहे. पुण्यात आतापर्यंत २५७ जणांचा मृत्यु झाला आहे¯