75 वर्षांची म्हातारी पण झोपडीतून चालवत होती ड्रग्जचा काळा धंदा; मुंबईतील वांद्रे भागातून सव्वा कोटींचे चरस जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वांद्रे पश्चिमेकडील चिंचवडी भागातील एक झोपडपट्टी़ त्यातील एका झोपडीमध्ये ७५ वर्षांची वृद्ध एकटीच रहाते. एकटीच असल्याने व म्हातारी असल्याने कोणाचे कधी तिच्याकडे लक्ष गेले नव्हते. पण रविवारी अचानक काही पोलीस तिच्या झोपडीत आले. त्यांनी झोपडीची तपासणी केली. तेव्हा त्यात चक्क सव्वा कोटी रुपयांचे ३ किलो ८०० ग्रॅम चरस आढळून आला. त्यामुळे तिच्या आजू बाजूला राहणार्‍यांनाही आश्चर्य वाटू लागले आहे.

जोहराबीन अकबर अली शेख असे या वृद्धाचे नाव आहे. ती शेजारच्या व्यक्तीची मदत घेत ड्रग्जची तस्करी करत होती. वृद्धा असल्यामुळे कोणाचेही तिच्याकडे आजवर लक्ष गेले नव्हते. मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाला एक जण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून किशोर गवळी (वय ५७) याला अटक केली. त्याच्याकडे चरसचे ७ गोळे आढळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आपण हा माल चिंचवडी भागात शेजारी राहणार्‍या वृद्धेकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गवळी याच्या शेजारी राहणार्‍या जोहराबीन शेख हिच्या झोपडीवर छापा टाकला. तिच्या झोपडीत ३ किलो ८०० ग्रॅम चरस सापडला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.