Satara News : रिक्षाच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, आजी अन् नातू गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –  रस्त्याने निघालेल्या आजी आजोबासह दोन नातवांना रिक्षाने ठोकरल्याने दीड वर्षाच्या नातीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या घटनेत आजी व नातू गंभीर जखमी झाले आहेत. कळंबे (ता. जि. सातारा) येथे मंगळवारी (दि. 2) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी संतप्त जमावाने मद्यधुंद रिक्षा चालकाला अडवून बेदम चोप दिला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कु. अनवी विकास इंदलकर (वय, दीड वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर कु. श्रावण मदन इंदलकर (वय 3.5 वर्ष), आजी रुक्मिणी कृष्णा इंदलकर (वय 58 वर्षे, सर्व रा. कळंबे) हे दोघे अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर चालक प्राण काशिनाथ पवार (वय 28, रा.आकले) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबे येथील भैरवनाथाची यात्रा कोरोनामुळे रद्द झाली आहे. यात्रेनिमित्त भैरवनाथाचे मंदिराबाहेरूनच देवाचे दर्शन घेऊन आजी-आजोबा आपल्या नातवांसह मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतत होते. याच दरम्यान मागून येणाऱ्या मालवाहतूक अ‍ॅपे रिक्षाने ( एम एच- 11 बी एल 0623) ठोकरले. अपघातानंतर पळ काढणा-या चालकास तरुणांनी पाठलाग करून पकडून त्यास बेदम चोप दिला. तसेच अ‍ॅपेमध्ये उसाची पाचट टाकून संतप्तयुवकांनी अ‍ॅपेरिक्षा पेटवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू मुलाणी, पाटोळे तपास करत आहेत.